पुणे – मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे दिले जाणारे पुरस्कार आणि पारितोषिक 2015 पासून प्रलंबित होते. त्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून 2015 आणि 2016 चे पुरस्कार महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी जाहीर केले. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिका भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम साहित्यिक वीणा देव आणि भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या समितीमध्ये नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अनिल गोरे, शाम भुर्के, प्रा. चारुदत्त निमकर, डॉ. विद्यागौरी टिळक, नितीन कोत्तापल्ले, संगीता पुराणिक, राजीव तांबे, स्वाती राजे यांचा समावेश आहे. सन 2015-16 सालासाठी मराठी भाषेतील आंतरराष्ट्रीय भाषेतील पुस्तकांचे मराठी अनुवादक, बालसाहित्य, कविता, कथा, कादंबरी, विज्ञानविषयक लेखन, मुद्रित शोधक, नवोदित साहित्यिकांचे पहिले पुस्तक, आर्थिक विषयक लेखन अशा एकूण 106 साहित्यकृती प्राप्त झाल्या असून साहित्य पुरस्कार विजेत्याला प्रत्येकी 25 हजार रुपये असे एकूण 17 पुरस्कार आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
12 पारितोषिकांचे होणार वितरण
ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिना’निमित्त पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक (खुला गट) असे एकून 187 पत्र प्राप्त झाली होती. त्यातून तीन क्रमांक काढले असून, प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये, द्वितीयला दोन आणि तृतीयला एक हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. अशाप्रकारे चार गटांच्या विजेत्यांची निवड झाली असून, एकूण 12 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.