पुसेगाव (सातारा) – वसना नदीवर ८८ लाख ७९ हजार रुपयांच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते आज रविवारी (दि. 5) भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शिरढोण गावचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जयवंत घोरपडे यांच्या बद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, “राजकीय जीवनात अनेक लोक भेटतात. त्यांपैकी जयवंत घोरपडे हे एक आहेत.” पुढे बोलताना गावची एकजूट अशीच अबाधित ठेवत गावचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
कोल्हापूरी बंधाऱ्यामुळे गावालगतच्या भागातून येणारे पावसाचे पाणी साठवण होऊन पिकांना थेट संरक्षित पाणी, परिसरातील जलस्रोतांचे पुनर्भरण करून भूगर्भजल पातळी वाढण्यास नक्की मदत होईल. या पाण्याद्वारे माझा बळीराजा बागायत शेती पिकवून चांगले उत्पादन घेऊन प्रगतीशील शेती करून कायमस्वरूपी सुखी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.