कारखान्याच्या गोडाऊनला आग
वरवंड -पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील साखरेच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये असलेली 69 हजार 376 क्विंटल साखर जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी 8 वाजण्याचा सुमारास घडली. दरम्यान, भीमा पाटसचे अध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल, तसेच संचालक यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.
पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 6 नंबरच्या गोडाऊनमधून 8 वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट येताना कामगारांना दिसून आले. यामुळे कामगारांनी कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवान दाखल झाले आणि अग्निशमनच्या बंबाने आग आटोक्यात आणली. हे गोडाऊन पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात असून, या गोडाऊनचे गोडाऊन किपर म्हणून शशिकांत काळे काम करीत आहेत.
मागील काही वर्षांतील गळीत हंगामातील एकूण 1 लाख 38 हजार 772 पोती साखर गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली होती. ती जाड ताडपत्रीच्या साह्याने झाकण्यात आली होती. संपूर्ण ताडपत्री जळाल्याने साखरेच्या पोत्यालाही आग लागली व त्यातील साखर बाहेर पडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाने पाणी मारण्यात आले; पण साखरेच्या पोत्यात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात शशिकांत काळे यांनी दिली आहे.
नुकसानाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
पुणे जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बॅंकेचे दौंड विभागीय अधिकारी एन. एस. थोरात, दौंड तालुका वसुली अधिकारी एस. एम. भागवत आणि शाखा अधिकारी एस. आर. चौधरी या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.