सिंदखेड राजा – भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच एका आदर्श भाऊबीजची सर्वत्र चर्चा होत असून मोठे कौतुक होत आहे. बहिणीने आजारी असलेल्या आपल्या भावाला यकृत दान करून बहीण भावाची पाठीराखी बनली आहे.
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी दुर्गा अरुण धायतडक यांनी त्यांचा भाऊ रमेश नागरे यांना स्वतःचे यकृत दिले आहे. यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले असून बहिणीकडून यावर्षीच्या भाऊबीज सणाला आगळीवेगळी भेट दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा येथील रहिवाशी रमेश नागरे (वय 48) वर्षे यांना 2019 पासुन पोटाचा त्रास होत होता. त्यांना यकृताचा आजार असल्याचे डॉक्टरानी सांगितले होते.
त्यानंतर त्यांनी विविध नामांकीत रुग्णालयामध्ये जावून उपचाराला सुरुवात केली. परंतु उपचार करून सुद्धा आजारामध्ये काहीच बदल होत नसल्यामुळे तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते.
रमेश नागरे यांच्या लहान बहीण दुर्गा यांची रक्त तपासणी करण्यात आली दोघांचाही रक्तगट ओ पॉझिटिव्ह जुळून आल्यामुळे बहिण दुर्गा यांनी क्षणाचाही विलंबना न लावता भावाला यकृत देण्यासाठी तयार झाल्या. त्यांचे पती अरुण धायतडक यांनी सुद्धा होकार दिला.
मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर रमेश यांच्यावर यकृत प्रत्यारोपांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्गा धायतडक यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे. यावर्षीच्या भाऊबीजेला बहिणीकडून भावालाच आगळीवेगळी भेट दिली असल्याचे पहायला मिळाले. दुर्गा धायतडक यांच्या या धाडसाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. सध्या रमेश नागरे व दुर्गा धायतडक यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.