पुणे : उपेक्षित कामगारांच्या प्रश्नाचं वास्तव दाखवणारा शिवाजी करडे दिग्दर्शित आणि निलेश धुमाळ निर्मित ‘भट्टी’ हा लघुपट सध्या वेगवेगळी मानांकन घेत यशाची शिखरे गाठताना पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय फिल्म संग्रहालय(एनएफएआई), पुणे याठिकाणी अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल शाॅर्टफिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भट्टी’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी तीन पारितोषके मिळाली आहेत. याचबरोबर सांगली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये देखील बेस्ट फिल्मचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. भट्टीचे हे यश ग्रामीण कथानक असलेल्या आणि ग्रामीण भागातून चित्रपट/लघुपट निर्मितीचे काम करणाऱ्यांना नक्कीच बळ देणारे ठरणार आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे करण्यात आले आहे. या लघुचित्रपटात वर्षा मालवणकर, शरद जाधव, राम गोविंदवाड, मलशीद्ध देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून मंगेश आरोटे, अपूर्वा कदम, किशोर गायकवाड, काकासाहेब शिंदे यांनी सहाय्यक भूमिकेचे काम पार पाडले आहे. याचबरोबर आनंद मनसुक यांनी छायाचित्रण केले असून संकलन प्रतीक पाटील यांनी केले आहे.
यासह वेशभूषा- आकाश बनसोडे, कला दिग्दर्शन- अतुल लोखंडे , रंगभूषा – विठ्ठल सोनवणे , संगीत – अमित पाटील, ध्वनी मुद्रण – आकाश छाया लक्ष्मण, ध्वनी संकलन – अमित पाटील, कलर – प्रतीक सारजोशी, कला सहाय्यक – शाम सर्वगोड, निर्मिती व्यवस्थापन – महेश क्षीरसागर, परमेश्वर भोंडवे. तर गणेश डुकरे, विक्रम बोळेगावे, किशोर गायकवाड, लखन चौधरी, सुधाकर शिंदे यांनी सहाय्यक दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
‘गेली कित्येक वर्षे उलटून गेली तरी कामगार वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. आपण म्हणतो की, आजच्या विज्ञान युगात समाज वैचारिकरित्या सुधारला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे आजही ज्या पद्धतीनं कामगार वर्गाला जो त्रास दिला जातो, त्यांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा फायदा उचलून त्यांची फसवणूक केली जाते, त्यांना हवं तसं राबवल जातं हे सर्व लक्षात घेता कामगार वर्गाने देखील त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला बळी न पडता त्यांच्या विरोधात आवाज उठवायला हवा. हा लघुपट अन्याय करणाऱ्या आणि अन्याय सहन करणाऱ्या दोघांनाही नक्कीच विचारात पाडायला लावणारा आहे. समाजाला आरास दाखवण्याचा प्रत्यत्न मी या ‘भट्टी’ च्या माध्यमातून केला आहे.’
– शिवाजी करडे ( भट्टी, लेखक-दिग्दर्शक )