मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून यामागे भाजपची फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी प्रथम गुजरात व त्यानंतर आसामची निवड केली होती. ही दोन्ही राज्यं भाजप शासित आहेत. आमदारांना गुजरातेतून गुवाहाटीला हलवताना पोलीस, सीआरपीएफ व नागरी उड्डाण मंत्रालयाने बजावलेल्या चोख भूमिकेवरून यामागे भाजपचं असावं अशी शंका बळावली होती.
अशातच आता एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ते बंडखोर आमदारांशी संवाद साधताना ‘तो एक राष्ट्रीय पक्ष (भाजप) आहे. महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितलं आहे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो देशातील ऐतिहासिक आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. काहीही लागलं तरी कमी पडणार नाही. त्याची प्रचिती तुम्हा सर्वांना येईलच.”
अशीही चर्चा सुरु आहे की,भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफर एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. यावरून पत्रकरांनी शिंदे यांना मुख्यमंत्री कि उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरबाबत विचारले असता ते म्हणाले,”मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही खूप पुढे आलो आहोत. आता आमच्यासोबत उपस्थित आमदार सर्व निर्णय एकत्र घेतील.’ असं म्हणत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.