अहमदाबाद – गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मातर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार केसरसिंह सोलंकी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. केसरसिंह यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते तातडीने आम आदमी पक्षात प्रवेश करते झाले आहेत.
या मतदारसंघात आम आदमी पक्षाने त्यांचा उमेदवार या आधीच जाहीर केल्याने केसरसिंह यांना त्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसताना त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याच्या घटनेला महत्त्व दिले जात आहे.
त्यांचे पक्षात स्वागत करताना आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इटालिया यांनी म्हटले आहे की, मातर विधानसभेचे लोकप्रिय, कष्टाळू, निर्भीड आमदार केसरीसिंह सोलंकी यांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणातून प्रेरित होऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे आम्ही पक्षात मनापासून स्वागत करतो असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने मातर जागेसाठी कल्पेश परमार यांना उमेदवारी दिली आहे. आपने या जागेसाठी महिपतसिंह चौहान यांचे नाव आधीच जाहीर केले आहे.