पुणे : सोशल मीडिया कंपनी मेटाने काढलेल्या 11 हजार लोकांपैकी अशा काही भारतीय IT professional चा समावेश आहे, ज्यांनी आपल्या चांगल्या नोकऱ्या सोडून दोन-तीन दिवसांपूर्वीच Meta कंपनी जाॅईन केली होती.
फेसबुकने खर्च कमी करण्यासाठी विविध देशांतील आपल्या 11,000 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. दोन दिवसांपूर्वी, Meta मधील IT professional नीलिमा अग्रवाल यांनी ‘लिंक्डइन’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, मेटाने काढलेल्या 11 हजार लोकांमध्ये त्यांचा समावेश देखील आहे.
नीलिमा अग्रवाल म्हणाल्या, “मी फक्त आठवडाभरापूर्वी भारतातून कॅनडाला शिफ्ट झाली होती आणि एवढ्या मोठ्या व्हिसा प्रक्रियेतून गेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी META मध्ये सामील झाली पण दुर्दैवी दुःखद दिवस आला आणि मला काढून टाकण्यात आले.” त्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात काम करत होत्या आणि मेटासाठी त्यांनी नोकरी सोडली होती.
आणखी एका तरुणाची नोकरी गेली
विश्वजित झा नावाच्या आणखी एका IT professional ने सांगितले की, बेंगळुरूमधील अॅमेझॉनमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, ते तीन दिवसांपूर्वी META मध्ये जाॅईन झाले होते आणि आता त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
दरम्यान…फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारखे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाद्वारे ऑपरेट केले जातात. फेसबुक, WhatsApp ची पॅरेंट कंपनी मेटाने आपल्या तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीचा वाढता खर्च आणि डिजिटल जाहिरातींच्या कमाईतील तीव्र मंदीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीने ही कारवाई केली आहे. ट्विटरनंतर मेटाने कर्मचाऱ्यांना दणका दिला असून कंपनीच्या 18 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
मेटाने सांगितले आहे की, ते प्रत्येक कामावरून काढलेल्या कर्मचार्याला 16 आठवड्यांचे मूळ वेतन (मूलभूत वेतन) वेगळे पॅकेज म्हणून देतील. याशिवाय,प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी दोन अतिरिक्त आठवडे मूळ वेतन दिले जाईल.
खरं तर, जगभरातील टेक कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. प्रथम कोरोना लॉकडाऊन आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढत्या अनिश्चिततेमुळे टेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.
यामागचे कारण असेही सांगितले जात आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीत अडचण येत आहे. कोरोनाच्या वाढत्या केसमुळे चीनमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे सप्लाय चेन आणि टेक कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत.