नवी दिल्ली – क्रीस्तोफर नोलनचा चित्रपट ‘ओपेनहायमर’ 21 जुलै रोजी भारतासह जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, चाहते रुपेरी पडद्यावर ही कथा पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र भारतात चित्रपट प्रदर्शित होताच काही दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आता याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाष्य केल्याचे समजते.
‘ओपेनहायमर’ या चित्रपटातील अडल्ट सीन दरम्यान भगवत गीतेचा मजकूर बोलतानाचा सिन शूट करण्यात आला आहे. ही बाब समोर येताच हा वाद आणखी वाढला आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याप्रकरणी सेन्सॉर बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता चित्रपटातील हा सीन काढून टाकण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
‘ओपनहायमर’मध्ये अभिनेता सिलियन मर्फीने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान त्याच्या हातात भगवद् गीता पाहून भारतीय प्रेक्षक भडकले आहेत. याच सीनवर आता ‘महाभारत’ मालिकेत श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेते ‘नितीश भारद्वाज’ यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी ते एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
नितीश भारद्वाज याबद्दल म्हणाले, या संदेशाचा चुकीचा अर्थ काढू नये. ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवला आणि त्याचा वापर जपानच्या बहुतांश लोकसंख्येला मारण्यासाठी केला गेला. त्यामुळे ते स्वत:साठी प्रश्न उपस्थित करत होते की त्यांनी आपलं कर्तव्य योग्य रितीने पार पाडलं की नाही? एका लोकप्रिय मुलाखतीत त्यांना रडताना पाहिलं गेलं. याचा अर्थ कदाचित त्यांना त्यांच्या आविष्कारावर पश्चात्ताप झाला असेल. त्यांचा आविष्कार भविष्यात मानवसृष्टीला नष्ट करेल हे त्यांना कळून चुकलं होतं आणि त्याचाच त्यांना पश्चात्ताप होता. असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणतात.., भगवद् गीता हे युद्धभूमीवर कर्म करण्याच्या भावनेबद्दल आहे. अकराव्या अध्यायातील 32 व्या श्लोकमध्ये अर्जुनाला एक योद्धा असल्याच्या नात्याने त्याचं कर्म करण्यास सांगितलं गेलं आहे. वाईट प्रवृत्तींविरोधात लढणं हे त्याचं कर्म आहे. कृष्णाच्या या संपूर्ण श्लोकाला नीट समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात की मी शाश्वत काळ आहे, जो प्रत्येक गोष्टीला मारू टाकेन. त्यामुळे तू मारलं नाहीस तरी प्रत्येक जण मरणार. म्हणूनच तू तुझं कर्तव्य पार पाड.’ असं देखील यावेळी त्यांनी म्हंटलं आहे.
काय आहे चित्रपटात नेमकं !
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आणि शोधांवर आधारित आहे. जे. रॉबर्ट हे अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. हा चित्रपट पहिला अणुबॉम्ब तयार करण्याचे श्रेय मिळालेल्या भौतिकशास्त्रज्ञाचा उदय आणि पतनाचे वर्णन करतो.