नवी दिल्ली – ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस आणि स्पेस एक्सचे संस्थापक ऍलन मस्क यांनी भारतामध्ये इंटरनेट आणि ब्रॉडबॅंड सेवा सॅटेलाईटच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा प्रस्ताव भारतासमोर सादर केला आहे. भारत सरकारने या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविला तर डिसेंबर,2022 पासून या सेवा सुरू करण्याचा मनोदय या दोन बलाढ्य अमेरिकन उद्योगपतींनी व्यक्त केला आहे.
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे भारतातील संचालक संजय भार्गव यांनी सोशल मीडियावर सांगितले की, सध्या अनौपचारिक पातळीवर भारतातून आमच्याकडे 5 हजार ग्राहकांनी विचारणा केली आहे. सॅटेलाइट आधारित ही सेवा भारतात सुरू केल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये किफायतशीर दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊ शकते.
डिसेंबर 2022 पर्यंत 2 लाख सक्रीय टर्मिनल मिळविण्याचा आमचा उद्देश आहे. जर सरकारने परवानगी दिली तर ही संख्या त्यापेक्षा जास्त वाढू शकते. यासाठी अनामत रक्कम 7,350 रुपये इतकी असेल. सध्या या सेवेचा वेग 500 ते 150 मेगाबाइट प्रतिसेकंद एवढा आहे. या दोन सेवा जर भारतामध्ये आल्या तर त्याचा रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन कंपन्यांच्या सेवावर परिणाम होऊ शकतो.
भारतामध्ये ग्रामीण भागात अजूनही ब्रॉडबॅंड सेवा पोहोचलेल्या नाहीत. आम्ही या क्षेत्रात आल्यानंतर नजीकच्या भविष्यामध्ये 100 टक्के भूभागावर ब्रॉडबॅंड सेवा देऊ शकतो. या विषयावर परवानगी देण्याची सरकारचे प्रक्रिया कमालीची गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आम्हाला स्पष्ट धोरण तयार करता येत नाही. यातच सेमीकंडक्टर चा तुटवडा जाणवत असल्याचे भार्गव यांनी सांगितले.
जेफ बेझॉस यांची अमेझॉन कंपनी भारतामध्ये सॅटेलाइट आधारित ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. ही सेवा सुरू केली तर ऍमेझॉन कंपनीच्या ई-कॉमर्स व्यवहाराला अधिक चालना मिळेल असे या कंपनीला वाटते.
याबाबत दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर या कंपन्यांनी भारतातील सर्व नियमांचे पालन केले तर त्यांना परवानगी देण्याच्या शक्यतेवर विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर सॅटॅलाइट आधारीत सेवा सुरू केल्यानंतर काही सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यावरही सरकारला विचार करायचा असतो.