ग्रामविकास अधिकारी निगडे : पुरंदर तालुक्याचा रिकव्हरी रेट 73.93 टक्के
सासवड – भिवरी (ता. पुरंदर) येथून काम, नोकरी व व्यवसायानिमित्त पुण्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे करोना रुग्णात वाढ होत आहे. लोकांनी आता तरी सावधान होऊन पुण्याशी संपर्क टाळावा असे आवाहन, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे यांनी केले.
पुरंदर तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) 4 जणांना लागण झाली आहे. यात सासवड 2, कोथळे, भिवरी प्रत्येकी एक असे 4 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तालुक्यातील 633 करोनाबधितांपैकी 468 बरे होऊन घरी गेल्यामुळे तालुक्याचा रिक्वरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) 73.93 टक्के असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
भिवरी येथे आढळलेला रुग्ण हा पुणे महानगरपालिकेत कर्मचारी असून सासवड येथील खासगी रुग्णालयात बुधवारी (दि. 5) दाखल झाला होता. तेथे त्याचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला त्यामुळे गावातील एकूण बाधितांची संख्या सहावर गेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली असून लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासक सतीश कुंभार यांनी केले आहे.
गायकवाड वस्ती येथे राहणारा आजचा रुग्ण असल्यामुळे या वस्तीवरील सात ते आठ घरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून रुग्णाच्या घरातील लोक घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहेत असे अविनाश निगडे यांनी सांगितले.