मुंबई – सराफा बाजारात गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरांत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव तब्बल सोडतीन हजाराने वाढला आहे. तर चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. सोन्याने आज मागील सर्व रेकॉर्ड मोडत सराफा बाजारात 56 हजार 191 रुपये प्रतितोळा इतका उचांक गाठला. तर आज चांदीचा भाव 73 हजार प्रतिकिलोवर पोहोचला आहे.
मागील पाच दिवसातील वाढ
3 ऑगस्ट : 53 हजार 717 रुपये प्रतितोळा
4 ऑगस्ट : 54 हजार 551 रुपये प्रतितोळा
5 ऑगस्ट : 55 हजार 098 रुपये प्रतितोळा
6 ऑगस्ट : 55 हजार 845 रुपये प्रतितोळा
7 ऑगस्ट : 56 हजार 191 रुपये प्रतितोळा
जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा कहर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करत आहे. कोरोनामुळे जागतिक आर्थिक बाजारात, शेअर मार्केटमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातीलच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे.
देशात, जगभरात आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांची, गुंतवणूकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान,यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच निवडक लोकांमध्ये लग्नाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, अशातच आता लग्नासाठी महत्त्वाचे असलेल्या सोन्याने सामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे.