कोपरगाव – अनेक आवाहनात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करून गौतम बॅंकेने केलेली प्रगती अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार आ.आशुतोष काळे यांनी काढत, यावर्षी सभासदांना 6 टक्के लाभांश देण्याबरोबरच गौतम बॅंक ग्राहकांना राष्ट्रीयकृत बॅंकेच्या बरोबरीने सर्व प्रकारच्या सेवा देणार असल्याचे सांगितले.
गौतम सहकारी बॅंकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बॅंकेचे मार्गदर्शक, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभासदांना मार्गदर्शन करताना आ.आशुतोष काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी बॅंकचे चेअरमन सुधाकर दंडवते होते.
आ.काळे म्हणाले की, बॅंकेच्या नगर जिल्ह्यात सहा व नाशिक जिल्ह्यात एक अशा एकूण 7 शाखा सक्षमपणे सुरू असून अजून एक शाखा काढण्यासाठी रिझर्व बॅंकेकडे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच मंजुरी मिळू शकते. दि.31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बॅंकेच्या ठेवी 106 कोटींच्या पुढे असून 66 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅंकेची सन 2022-23 चे वर्षाअखेरीस गुंतवणूक 51 कोटी 77 लाख, ढोबळ नफा 4 कोटी 16 लाख 21 हजार रुपये, तर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 52 लाख 48 हजार इतका झालेला आहे. खेळते भांडवल 130 कोटी 75 लाख 6 हजार इतके आहे. बॅंकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण 1.64% इतके आहे. बॅंकेला अहवाल सालात ऑडीट वर्ग “अ’ मिळालेला आहे. यावर्षी सभासदांना लाभांश देता येणार आहे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, श्रीराम राजेभोसले, शिवाजी घुले, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने, माजी चेअरमन बाबासाहेब कोते, नारायणराव मांजरे, वसंतराव दंडवते, बाबुराव कोल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, मा.सभापती अर्जुनराव काळे, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बॅंकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड आदी मान्यवर उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील 16 विषय एकमताने मंजूर झाले.
– करोना महामारीपासून प्रत्येक बॅंकेच्या ग्राहकाला कॅशलेस व्यवहाराची सवय लागली असून लवकरच गौतम बॅंकेच्या गौतमनगर व कोपरगाव शाखेमध्ये एटीएम मशीन बसविणार आहे. नुकतीच रिझर्व्ह बॅंकेकडून मोबाईल बॅंकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकेत मिळणाऱ्या ऑनलाईन बॅंकिंग सेवा देखील गौतम बॅंकेच्या ग्राहकांना मिळणार आहे. गौतम बॅंक प्रगतीबरोबरच आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
– आ.आशुतोष काळे.