पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनावळे कचरा डेपो सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्याने पुनावळे, हिंजवडी, वाकड, ताथवडे आणि रावेत भागातील नागरिकांनी कचरा डेपोला विरोध दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरु केली आहेत. आज रविवारी (दि. ३) पुनावळे येथे घंटानाद आंदोलन करत स्थानिक नागरिकांनी ‘कचरा डेपो हटाओ’ चा नारा दिला.
पुनावळे कचरा डेपो डिसेंबर २०२३ अखेर सुरु करण्याच्या हालचाली पालिका प्रशासन करत आहे. कचरा डेपोमुळे परिसरातील वातावरण दुषीत होणार असल्याची भिती स्थानिक नागरिकांना वाटत आहे. यामुळे पुनावळेसह, वाकड, हिंजवडी, ताथवडे, रावेत या भागातील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचण्याची शक्यता वाटते आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करुन कचरा डेपोला विरोध दर्षविला आहे. पुनावळे भागातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातून कचरा डपोला विरोध होताना दिसत आहे.
महापालिका प्रशासन आपली भूमिका बदलत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आज रविवारी (दि. ३) पुनावळे येथील रहिवाशी आणि पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी संयुक्त पुढाकाराने घंटा नाद आंदोलन केले. लोटस शाळेपासून सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. लहान मुले, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
पोतराजाने स्वतःच्या शरिरावर चाबकाचे फटकारे ओढत आपल्या वाद्यावर ताल धरला. ‘कचरा डेपो हटाव, पुनावळे बचाव..’ अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. कचरा डेपो सुरु करुन आमच्या जीवाशी खेळत असाल तर आम्ही तुम्हाला मतदान का करायचे ?, आमच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क सरकारला आहे का ?, अशा आशयाचे फलक घेऊन लहान मुले आंदोलनात सहभागी झाले होते.