नवी दिल्ली – हरियाणाच्या मुख्यमंत्री पदावर नायब सिंह सैनी यांची अचानक लॉटरी लागली आहे. ते इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समुदायातून येतात हे त्याचे कारण असल्याची चर्चा आहे. तसेच सैनी हे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे अत्यंत विश्वासू असल्याचेही मानले जाते.
हरियाणातील राजकारणही कायम जात केंद्रीत राहीले आहे. सैनी यांच्या निवडीत तोच मोठा फॅक्टर ठरला. जाट समुदायाचे नसलेल्या मतदारांना एकत्रित करण्याचा हा भाजपचा प्रयत्न म्हणूनही सैनींच्या निवडीकडे पाहिले जाते. हरियाणात जाटांचे प्राबल्य आहे व सैनी यांची निवड ही ओबीसी समुदायात आपली मतपेढी घट्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हरियाणात ओबीसी मतदारांची संख्या आठ टक्के आहे. या समुदायाचे सैनी हे अत्यंत प्रबळ नेते आहेत. कुरूक्षेत्र, यमुनानगर, अंबाला, हिसार आणि रेवाडी आदी जिल्ह्यांत सैनी जातीची लोकसंख्या लक्षणीय किंवा निर्णायक आहे.
हरियाणाच्या एकूण लोकसंख्येत जाट २३ टक्के आहेत. राज्याच्या राजकारणावर कायमच जाटांचे वर्चस्व राहीले आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी किमान ४० जागांवर जाटांचा थेट प्रभाव असतो. २०१४ च्या निवडणुकीत जाटांनी भारतीय जनता पार्टीला एकगठ्ठा मते दिली होती. तथापि, २०१९ मध्ये जाटांची मते कॉंग्रेस, जेजेपी आणि आयएनएलडीकडे वळली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुकीती पराभवाचा सामना करावा लागला.
माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर पंजाबी समुदायातून येतात. ही गोष्टही जाटांना खटकणारी होती. २०१६ मध्ये जाटांनी आरक्षणासाठी जे मोठे आंदोलन केले त्यामागे हेच कारण होते. २०१४ पूर्वी अशी स्थिती होती की राज्याच्या मुख्यमंत्री जाट समुदायाचाच व्यक्ती असायचा. कॉंग्रेसचे भूपिंदर हुडा दहा वर्षे मुख्यमंत्री होते ते जाट मतपेढीमुळेच.
दुष्यंत चौटाला यांची एक्झिट फायद्याची
राज्यातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार जेजेपीचे सत्तेतून बाहेर पडणे भाजपसाठी आणि खुद्द जेजेपीसाठीही फायद्याचे ठरणार आहे. भाजपला जाटेतर मतांचे राजकारण करायचे आहे. मात्र त्याचवेळी जाटांची एकगठ्ठा मते कॉंग्रेसला जाणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायची आहे. तसे झाले तर भाजपला राज्यात फटका बसू शकतो. त्यामुळे जेजेपीच्या दुष्यंत चौटालांची एक्झीट भाजपला लाभदायक ठरेल कारण जाटांची मते त्यांच्याकडेही वळतील. त्यामुळे चौटालांची मते तर शाबुत राहतीलच मात्र या फुटीमुळे कॉंग्रेसलाही फार लाभ होणार नाही. भाजपला मात्र या फुटीचा पुरेपूर लाभ होईल.