चिंचवड, रावेत, सांगवी येथे जलपर्णी काढण्याचे काम सुरू
पिंपरी – पवना नदीपात्रात सध्या चिंचवड, रावेत आणि सांगवी अशा तिन्ही ठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जलपर्णी काढण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार नदीपात्रातील जलपर्णी काढली जात आहे.
याबाबत दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जलपर्णी काढण्यास प्रारंभ झाला आहे.
महापालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिराजवळ साचलेली जलपर्णी यापूर्वी काढण्यात आली होती. तसेच, थेरगाव येथील केजुदेवी मंदिराजवळील जलपर्णी काढण्याचे काम देखील करण्यात आले. मात्र, “करोना’च्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जलपर्णी काढण्याचे काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास अडथळा येत होता. पोलिसांकडून विचारणा केली जात होती. त्यामुळे चिंचवड येथील जलपर्णी काढण्याचे काम थांबले होते.
नदीमध्ये वरील बाजूस जलपर्णी वाहून येऊ नये, यासाठी दोर बांधण्यात आला होता. मात्र, तो कोणीतरी तोडल्याने जलपर्णी वाहून आली. त्यामुळे मोरया गोसावी मंदिराजवळ नदीपात्रात पुन्हा जलपर्णी पाहण्यास मिळत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त “दै. प्रभात’मध्ये 29 मार्चला प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता लगोलग येथे जलपर्णी काढण्यास सुरवात झाली आहे. पोकलेन आणि कामगारांच्या मदतीने येथील जलपर्णी सध्या काढली जात आहे.
रावेत येथील बास्केट ब्रिजपासून चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरापर्यंत जलपर्णी काढण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. रावेत येथील जाधव घाट येथे कामगार आणि बोटीच्या सहाय्याने जलपर्णी काढली जात आहे. सांगवी येथे देखील जलपर्णी काढण्याचे काम केले जात आहे. येथे वरील बाजूने वाहून येणारी जलपर्णी काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेले आहे.
पवनेतील जलपर्णी काढण्याचे काम सध्या चिंचवडगाव, रावेत आणि सांगवी येथे केले जात आहे. रावेत
बास्केट ब्रिजपासून चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरापर्यंत साचलेली जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाणार आहे. सांगवी येथील जलपर्णी काढण्याचे काम जवळपास होत आले आहे. तथापि, येथील नदीपात्रात वरील बाजूने वाहून येणारी जलपर्णी काढण्यासाठी कर्मचारी नेमलेले आहेत.
– पारोज कुमारबाबू, मुख्य आरोग्य निरीक्षक.