शेवगाव – शेवगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील झाडू व गटार कामगारांचे तीन महिन्यापासून पगार न झाल्याने अखिल भारतीय सफाई कामगार संघटना शाखा नगर व शेवगाव यांच्या वतीने भिक मागो आंदोलन करीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 135 झाडू व गटार कामगारांना तीन महिन्यापासून पगार झालेले नाहीत. जे कामगार समावेशनमध्ये आहेत अशांचे पगार झालेले असून ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचे काम सुरु आहे. याच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्या वतीने आंबेडकर चौकापासून शिवाजी चौकापर्यंत कामगारांनी झोळ्या करुन भिक मागो आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी पुढे येणाऱ्या धार्मिक सणाच्या अगोदर पगार न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात आखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज चावरे, तालुकाध्यक्ष राजु गायकवाड, सुरेश चव्हाण, संतोष मोहिते, नामदेव साळवे, किरण मिरपगार, प्रकाश चव्हाण, सुनिल आहुजा, पद्मा चव्हाण, हिरा मोहीते, सारीका छलाणी, साखरबाई दुसंग, किशोर दुसंग, विमल मोहीते आदी सहभागी झाले होते.