बीड – म्हशीवर करणी केली म्हणून बदला घेण्यासाठी चार वर्षीय चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नेकनूर परिसरातील रत्नागिरी (ता. बीड) येथे घडली आहे. शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ (वय-6 वर्ष) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव असून याप्रकरणी पोलीसांनी रोहिदास नवनाथ सपकाळ आणि देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी शुभमचा मृतदेह नेकनूर परिसरातील रत्नागिरी (ता. बीड) येथे शाळेच्या आवारात आढळला होता. त्याच्या गळ्याभोवती लालसर खुणांमुळे त्याचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालायात झालेल्या उत्तरीय तपासणीत त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
संशयावरून पोलीसांनी देवईबाई व रोहिदास नवनाथ सपकाळ या भाविकीतील दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता. त्यांनी खुनाची कबूली दिली. म्हशीला करणी करून ठार मारल्याचा बदला घेण्यासाठी खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुले खेळत असताना रोहिदास सपकाळ याने शुभमला उचलून बाजूला नेले आणि त्याचा गळा आवळून खून केला आणि नंतर शाळेच्या आवारात आणून टाकले.