बीड – आधी बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या पत्नीची तक्रार यामुळे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चर्चेत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर त्यांच्या विरोधक आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. अशातच दोघं बहिण-भाऊ बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी पंकज यांनी जोरदार भाषण केले.
श्री क्षेत्र गहिणीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या कार्याची आठवण करुन दिली. जीवनात आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात. आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण माणूस म्हणून जन्म घेतला असल्याने आपल्या समोर काही आदर्श असतो आणि तो आदर्श बघून आपणही आदर्श निर्माण करतो. वामनभाऊंचा आदर्श आपल्यासमोर असल्याचं पंकजा म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
समाजात सहज आदर्श निर्माण होत नाही. खूप त्याग निर्माण करावा लागतो. खूप बलिदान करावं लागतं. खूप कठीण परिस्थीतून जगावं लागतं. गोपीनाथ मुंडे यांची आठवण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे, असं म्हणत पंकजा म्हणाल्या की खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट समाजाला समर्पित करावे लागतात”.