बीड – रोडवर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पिकअपची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात राक्षसभुवन येथील बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन सवळेश्वर येथे रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली. चंद्रशेखर पाठक (वय 39), मुलगा आर्यन पाठक (वय 12) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर मुलगी मंजिरी (वय 11) ही गंभी जखमी झाली आहे. तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघेही पिकअपमधून प्रवास करत होते.
तिघेही पिकअपमधून रात्री अकराच्या सुमारास शहागडवरून राक्षसभुवनच्या दिशेने येत होते. सावळेश्वर जवळ ऊस भरण्यासाठी एक ट्रॅक्टर उभा होता. अंदाज न आल्याने उभ्या ट्रॅक्टरला पिकपची पाठीमागून जोरात धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, पिकपच्या समोरच्या बाजूचा पूर्ण चुराडा झाला आहे. अपघातानंतर ऊस भरणाऱ्या मजुरांनी त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत बाप लेकाचा मृत्यू झाला होता आणि अकरा वर्षाची मंजिरी गंभीर जखमी झाल्याने तिला आणि अन्य दोघांना बीडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चंद्रशेखर पाठक हे भिक्षुकी होते. राक्षसभुवन गावामध्ये दशक्रिया विधी आणि अन्य पूजापाठ करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. दोन मुले, पत्नी आणि आई असा त्यांचा परिवार होता. कुटुंबातील दोघा पुरुषांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राक्षसभुवन गावावर शोककळा पसरली आहे.