Beed Lok Sabha Election 2024 । बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे मविआचा उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. अशातच दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू आहे. ( Jyoti Mete | Pankaja Munde )
याबाबत शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी, असा एकमताने निर्णय झाल्याचे समजते. विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचे काम केले आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते.
दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले आहे.
त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपासोबत असलेला शिवसंग्राम पक्ष आता शरद पवार गटात जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. ( Jyoti Mete | Pankaja Munde )