बीड जिल्हा बॅंकेत कोट्यवधी रुपये खाऊन नावाप्रमाणे धनवान झाले

अन्‌ डॉ. विखे पत्रकारांवरच घसरले

सभेच्या सुरुवातीलाच डॉ. विखे यांचा सत्कार कोणी करायचा यावरुन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः डॉ. विखे यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा घेऊन भाषण सुरू केले. गोंधळाच्या विषयावरून विखे पत्रकारावरही चांगलेच घसरले. चांगले काम केलेले कधीही वृत्तपत्रात येणार नाही. मात्र विखे यांच्या सभेत गोंधळ झाला अशी बातमी तेल मीठ लावून छापतील. ग्रामीण भागातले (खालचे) पत्रकार बातमी चांगली पाठवतील पण वर गाळण लावणारे आहेत असे सांगून वरिष्ठ पत्रकारांनाही त्यांनी कानपिचक्‍या दिल्या.

पाथर्डी – बीड जिल्हा सहकारी बॅंकेचे कोट्यवधी रुपये खाऊन माझ्यावर टीका करणारे नावाप्रमाणेच धनवान झाले. स्व. गोपीनाथ मुंडे असतांना भाजपत राहून राष्ट्रवादीचा प्रचार करून यांनी डुबलीकेटपणा केला. तुम्ही बीडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करून डिपॉजिट वाचवण्याचे प्रयत्न करा, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे अनामत रक्कम आम्ही जप्त करू, अशी खरमरीत टीका भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केली.
खरवंडी येथे प्रचार सभेत डॉ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, जि.प. सदस्य राहुल राजळे, सोमनाथ खेडकर, रामनाथ बंग, अमोल गर्जे आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी नगरच्या सभेत सुजय यांचे नाव कुजय असे असायला हवे होते अशी टीका केली होती. त्याचा समाचार डॉ. विखेंनी खरवंडी येथील सभेत घेतला. विखे म्हणाले, आ. राजळे यांनी मागील वाद विसरून मला स्वीकारले आहे. मतदार संघाच्या विकासाच्या मुद्‌द्‌यावर आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याने माझ्याशी वाद घातल्याने मी मोठा झालो आहे. त्यामुळे वाद कधीकधी फायद्याचाही असतो.

जिल्ह्याचा विकास पाण्याअभावी थांबलेला आहे. मला लोकसभेत काम करण्याची संधी दिल्यास पाच वर्षाचा सर्व निधी पाण्यासाठी खर्च करून जिल्ह्याचा विकास आपण साध्य करण्याची खात्री देतो. मी धनवान उमेदवार असल्याची टीका होते. संपत्ती कमावणे गैर नाही. आम्ही कुणाच्या घरांवर दरोडे टाकून किंवा जमीन बळकावून संपत्ती कमावली नाही. रस्त्याच्या, बंधाऱ्याच्या, तहसीलच्या किंवा पोलीस ठाण्यातील टक्केवारीवर जगणारे आम्ही नाहीत, अशी टीकाही त्यांनी संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली. माझी बांधीलकी शेतकऱ्यांशी असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी प्रसंगी पक्षाच्या विरोधातही बोलण्याची आपली तयारी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.