सातारा -जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले असून त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमधील बेड उपलब्धतेची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. बेड उपलब्धता समजल्याने गरजू रुग्णाला वेळेत बेड मिलण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्व करोनाच्या रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयातून ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. श्री. पाटील म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील करोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या र्लीेंळव19ीरींरीर.ळप लिंकद्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे.’
एखाद्या तालुक्यात बेड उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का नाही याची माहिती या लिंकवर मिळू शकते आणि बेडअभावी उपचार न मिळण्याच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.यावेळी कोरी रोशन सोल्युशन एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी याचे सादरीकरण केले. याबद्दल काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हासुध्दा जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.