मुंबई : शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याची स्पष्टपणे टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शरद पवारांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ दिला.तसेच “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचे मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केला आहे. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन टीका केली यावर सुप्रिया यांनी मोजक्या शब्दात राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते. याचा उपयोग जर पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.