केंदूर -करंदी (ता. शिरूर) येथे एका वायरमनला दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वायरमन मनोज तुळशीराम भिमटे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजाभाऊ भगवंत ढोकले, सागर नानासाहेब टाकळकर (दोघे रा. करंदी) यांच्याविरोधात पोलियांनी गुन्हा दाखल केला आहे.
करंदी गावाला विजेचा प्रवाह वारंवार कमी दाबाने येत असल्याचा तक्रारी येत असल्याने भिमटे यांनी करंदीच्या परिसरात पाहणी केली असता गणपतीमाळ याठिकाणी काही लोकांनी कालव्यावरून पाणी उपसण्यासाठी अनधिकृतपणे वीज वापर करूत असल्याचे आढळले. त्यामुळे त्याठिकाणी चोरून वीज वापरून मोटार सुरू असलेल्या बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी राजाभाऊ ढोकले यांनी येऊन वायरमन भिमटे यांच्या कानशिलात लगावली.
भिमटे यांच्यासोबत असलेले सहकारी त्या ठिकाणाहून निघून जात असताना ढोकले याच्या साथीला असलेला सागर टाकळकर याने स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून वायरमन भिमटे आणि सहकाऱ्यांना जाण्यास मज्जाव केला; मात्र दोघांच्या तावडीतून वायरमन पळून जात असताना टाकळकर आणि ढोकले यांनी या सरकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.