पुणे – घरखाली करण्यास सांगितले म्हणून भाडेकरुने घरमालकास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना पद्मावती येथील मातंग हौसिंग सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात राजेश मोतीलाल रजपूत, राकेश मोतीलाल रजपूत, विक्रांत राजेश रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी सोनू सुनील अवघडे (22, रा.पांडवनगर, शिवाजीनगर) यांचे वडिल पीएमपीमध्ये नोकरीस होते. त्यांचा 2019 मध्ये मृत्यू झाल्याने त्यांना राहाते घर खाली करण्यास सांगण्यात आले होते. तर, त्यांचे स्वत:च्या मालकीचे घर त्यांनी आरोपी रजपूत कुटुंबाला भाड्याने दिले आहे.
रविवारी सायंकाळी सोनू, त्याची आई आणि चुलत दाजी असे रजपूत यांच्या घरी गेले. सोनू याने रजपूत कुटुंबास घर खाली करण्यास सांगीतले. याचा राग मनात धरून रजपूत कुटुंबाने सोनूला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
ही भांडणे सोडविण्यास त्याचे दाजीमध्ये पडले असता, त्यांना विक्रांत रजपूतने डोक्यात दगड मारून जखमी केले. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत