बारामती – ढेकळवाडी (ता. बारामती) येथे ढेकळवाडी ते पस्तीसफटा या रस्त्याच्याकामासाठी जमीन मोजून खुणाचे काम करताना आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना येथील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कायदेशीर मार्गाने जमीन मोजावी. त्यानंतरच रस्त्याचे काम करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. मात्र, यावेळी पोलीस बळाचा वापर करून काही शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1312420825764286/
एकाच रस्त्याच्या 5 क प्रति देणाऱ्या भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अनेक वर्षापासून रखडलेल्या ढेकळवाडी ते 35 फाटा रस्त्याची भूमी अभिलेख विभागाने मोजणी केली. एकाच रस्त्याची आतापर्यंत पाचवेळा मोजणी केली आहे. परंतु प्रत्येक मोजणीत वेगवेगळे हद्द कायम केली. भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या अजब कारभाराचा मनस्ताप होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
एका शेतकऱ्यासाठी इतर सर्वसामान्य 30 ते 40 शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. बेकायदेशीर मार्गाने होत असलेल्या रस्त्याला विरोध केल्याने पोलीस बळाचा वापर करीत जबरदस्तीने खुणा दाखवल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांना मारहाण केली. गुन्हे दाखल करू, असा सज्जड दम भरला.
राजकीय वरदहस्ताने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. करोनाची परिस्थिती असताना पोलीस फौजफाटा मागवून शेतकऱ्यांची गळचेपी करण्यात आली. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. याप्रकरणी शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असून पवार याबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
ढेकळवडी येथील रस्ता मोजून खुणा कायम करत असताना पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस संरक्षण देण्यात आले होते. 12 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.
– अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक