पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम असताना उद्या (दि.28) मात्र शासकीय कर्मचारी – अधिकारी यांना मात्र कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. राज्य शासनाने आता एक अधिसूचना प्रसिध्द केली असून यामध्ये ईद-ए -मिलाद ची सुट्टी गुरुवार दि.28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि.29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. (Anant Chaturdashi 2023)
अनंत चतुर्दशी गुरुवारी असून या दिवशी नागरिकांना घरगुती गणपतींचे विसर्जन, सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करायचे आहे. तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. आता मात्र शासनाने गुरुवारी ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द करून ती सुट्टी शुक्रवारी दिल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे उद्या (दि.28) शासकीय कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे.
दरम्यान गणेश विसर्जनाच्या सुट्टीवरून शासकीय कर्मचाऱ्यांचे संभ्रमाचे वातावरण झाले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका , इतर शासकीय संस्था तसेच निमशासकीय संस्थांनी गुरुवारी कामावर हजर राहण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण –
शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रमुख रस्ते बंद असतात, तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन करायचे आहे, त्यामुळे या धावपळीत कार्यालयात वेळेवर कसे पोहचायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.