पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक कधी होईल, हे सद्यस्थितीत सांगता येत नाही. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांकडून शक्तीप्रदर्शनाची किंवा आपले नाव चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. 15 ऑगस्ट पाठोपाठ दहीहंडीतही राजकीय मंडळींनी भव्य-दिव्य आयोजन करत आपल्यासोबत असलेल्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन घडवून आणले. सार्वजनिक उत्सवासाठी जमणारी गर्दी ही आपल्या समर्थकांची गर्दी आहे हे दाखविण्यासाठी राजकीय मंडळींनी उत्सवांचे आयोजन वेगळ्या प्रकारे केले होते.
करोना महामारीमुळे गेली दोन वर्ष दहीहंडी सार्वजनिकरित्या साजरी झाली नव्हती. त्यामुळे यंदा शहरातील विविध भागात दहीहंडी चित्रपट सुष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, लाखोंची बक्षिसे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आत्तापर्यंत पालिका निवडणूक विभागाने अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अंतिम मतदार याद्या अशी सर्व महत्वाची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. सत्तारूढ झालेल्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रियाच स्थगित केली. तसेच 2017 प्रमाणे चारच्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले. वारंवार निवडणुकीच्या प्रक्रियेस ब्रेक लागत असल्यामुळे राजकीय वातावरण देखील चढ-उतारांचे आहे.
महापालिकेची निवडणूक कधी होईल, हे सध्या सांगता येत नाही. तसेच प्रभाग तीनचा की चारचा हे सध्यातरी स्पष्ट होत नाही. परंतु इच्छुकांनी आपले प्रयत्न सर्व पद्धतीने सुरू ठेवले आहेत. करोनामुळे गेल्या दोन वर्षांत दहीहंडीचा सण सार्वजनिक पध्दतीने साजरा झाला नव्हता. यंदा करोनाची लाट कमी झाली आहे. त्यामुळे दहीहंडीचा उत्सव शहरात
गणेशोत्सवही होणार धुमधडाक्यात
करोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. मात्र, आता करोनाची लाट कमी झाली असून सण, उत्सवावरील सर्व निर्बंध राज्य सरकारने उठविले आहेत. त्यामुळे शहर परिसरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्या धुमधडाक्यात होण्याची शक्यता आहे.