मुंबई – ‘हरहर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात काही दिवसांपसूर्वी बोलताना केला होता. संभाजीराजे म्हणाले होते की, नव्याने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात येत आहे. ज्या घराण्याचे आपण नाव सांगतो, जे नाव आणि कर्तृत्व ही आपली अस्मिता आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विपर्यस्त चित्रण दाखवले तर सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला होता.
दरम्यान, आता या चित्रपटावरून पुन्हा एकदा संभाजीराजे आक्रम झाल्याचं दिसून आले आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशलवर चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केली आहे.
लवकरच ‘हर हर महादेव’ चित्रपट झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर संभाजीराजेंनी झी स्टुडिओला इशारा दिली आहे. “हर हर महादेव’ हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल’. असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
आपल्या पोस्ट मध्ये संभाजीराजे नेमकं काय म्हणाले….
“हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.
हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल…” या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.