दखल: फसवणुकीच्या घटना रोखण्यास सतर्कता हवी!

जयेश राणे

अमुक रक्‍कम गुंतवल्यास अल्प कालावधीत दुप्पट, तिप्पट अथवा अनेक पटीत परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतात. याला अनेकजण बळी पडतात. कमी वेळेत अधिक नफा हा विचार डोळ्यासमोर असल्याने या ठिकाणी अन्य बारकाव्यांचा विचार होत नाही, त्यामुळे आर्थिक फसवणूक होते.

सोशल मीडियावरील मैत्री किती खरी आणि किती खोटी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मैत्री ही कायम डोळस असावी म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक फसवणूक होण्यापासून वेळीच स्वतःचा बचाव करता येणे शक्‍य असते. मात्र, या सूत्रांचा विचार कितीजण करतात? हा सुद्धा एक अत्यंत लक्षवेधी मुद्दा आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर समोरील व्यक्‍तीच्या नावे बोट मोडण्यापलीकडे काहीही करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षपणे होत असलेली मैत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्‍तींसह होत असलेली मैत्री चौकसपणेच केली जाणे आवश्‍यक आहे. ज्या मैत्रीत शारीरिक, आर्थिक सूत्रांचा प्रवेश होण्याची शक्‍यता वाटत असते. त्यांनी पुढील त्रास टाळण्यासाठी अशा लोकांपासून दूरच राहिले पाहिजे.

फेसबुक फ्रेंडच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक होण्याच्या घटना समोर येत असतात. विशेषतः विदेशात असणाऱ्या व्यक्‍तीकडून कधीतरी एका स्त्रीला फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि ती त्या स्त्रीकडून स्वीकारलीही जाते. पुढे त्यांच्यात बोलणे वाढते आणि त्या स्त्रीकडून अलगदपणे तिची संपूर्ण माहितीच काढून घेतली जाते. त्याप्रमाणे या स्त्रीला कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून आपल्याला हवे तसे वागवता येईल, याचाही विचार प्राधान्याने होत असणारच! थोडक्‍यात, जाळ्यात अडकलेल्या त्या स्त्रीचे नियंत्रण (रिमोट कंट्रोल) एका लबाड व्यक्‍तीकडे सुपूर्द होते. याला कारणीभूत कोण? तर त्या स्त्रीने त्या फेसबुक फ्रेंडवर टाकलेला अंधविश्‍वास.

फेसबुक फ्रेंडने फसवल्याचे नुकतेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. लंडनवरून फेसबुक फ्रेंडने पाठवलेले सरप्राइज गिफ्ट एका गृहिणीला 30 लाखांना पडले असून परदेशातून आलेल्या पार्सलसाठी विविध प्रकारचे टॅक्‍स भरण्याच्या नावाखाली, तसेच भीती दाखवून भामट्यांनी या गृहिणीकडून पैसे उकळले आहेत. फेसबुक फ्रेंडसह तिघांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड (पूर्व) येथील शीतलनगरमध्ये ही 48 वर्षीय गृहिणी राहात असून तिचा पती कंत्राटदार आहे. जूनमध्ये पायलट पॅट्रिक याने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट गृहिणीने स्वीकारली. सुरुवातीला मेसेजद्वारे संवाद साधता-साधता नंतर दोघेही मोबाइलवर एकमेकांशी बोलू लागले. नंतर पॅट्रिक याने लंडनवरून गिफ्ट पाठवत असल्याचा मेसेज केल्यानंतर महिलेने हे गिफ्ट घेण्यास नकार दिला.

मात्र, मनापासून मी गिफ्ट देत आहे. त्यामुळे ठेव अशा पद्धतीने पॅट्रिक याने महिलेला भावनिक जाळ्यात पकडले आणि सुरुवातीला गिफ्ट घेण्याविषयी नकार देणारी महिला नंतर मात्र गिफ्ट घेण्यास तयार झाली. त्याचदरम्यान दिल्ली कस्टम ऑफिसमधून महिलेला फोन आला. लंडनमधून आलेले पार्सल घेण्यासाठी 21 हजारांची मागणी महिलेकडे केली आणि येथून ही महिला फसवणुकीच्या जाळ्यात अडकली. महिलेने तत्काळ पैसे बॅंक खात्यात वर्ग केले. त्यानंतर गिफ्टसाठी महिलेकडे पैशाची मागणी चालू होती. इंटरनॅशनल मनी मॉनेटरी फंड, युनाटेड नेशन अँटी टेरीरिस्ट फंड क्‍लीरिअन्स आदी विविध नावाने प्रमाणपत्र पाठवत महिलेला भीती दाखवली आणि महिलेकडून तब्बल 30 लाख 24 हजार 447 रुपये उकळले. या फसवणुकीप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पॅट्रिक याच्यासह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली.

म्हणजे रक्‍कम गुंतवण्यास सांगत असलेल्या संस्थेची सरकारकडे अधिकृत नोंदणी आहे का? हा सर्वप्रथम विचार झाला पाहिजे. एवढा विचार अत्यल्पजण करतात आणि योग्य त्या ठिकाणीच गुंतवणूक करून स्वतःची लूट होण्यापासून सावध राहतात. पैशांची आवश्‍यकता सर्वांनाच असते. पण ती आहे म्हणून शॉर्टकट पत्करणे धोक्‍याचे ठरू शकते. फसवणूक करणारे आपल्या जाळ्यात कोणी फसते का? याची कायम चाचपणी करत असतात. फसवणूक करणारे लबाडीच्या मार्गावर चालण्यासाठी सतर्क असतात. असे असताना एक मार्गी असणाऱ्या व्यक्‍तीही काही प्रसंगी यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे आवश्‍यक त्या गोष्टींची पारख झाल्याविना पुढचे पाऊल टाकू नये. थोडा विलंब झाला तरी चालेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.