आझम खान यांच्या निलंबनाची मागणी

सर्वपक्षीय खासदारांकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली- महिलांचा अनादर करणाऱ्यांना अद्यल घडेल अशी कारवाई समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्यावर करावी, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत केली. अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह सर्व पक्षांच्या महिला खासदारांनी सुध्दा आझम खान यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.

ट्रिपल तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना पीठासीन रमादेवी यांच्याप्रती अनादर विधान करणे समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांनी आज आझम खान यांना निलंबित करण्याची मागणी रेटून लावली. लोकसभा म्हणजे काही पुरुषांनी महिलांच्या डोळ्यात पाहण्यासाठी येण्याचे ठिकाण नाही. संपूर्ण लोकसभेसाठी हा लाजिरवाणा प्रकार होता. सभागृहात बोलण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. एखाद्या महिलेसोबत असे गैरवर्तन सभागृहाबाहेर झाले असते, तर त्या महिलेने पोलीस संरक्षण मागितले असते. आम्ही गप्प राहून मुकदर्शक बनू शकत नाही, अशा शब्दांत आपला राग व्यक्त करीत स्मृती इराणी यांनी निलंबनाची मागणी केली.

सभागृहात मंत्री आणि भाजप खासदारांबरोबरच इतर पक्षांच्या खासदारांनीही आझम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आपण महिलांच्या अपमानाचा विरोध करत असून हे प्रकरण संसदीय समितीकडे न्यावे अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी केली आहे.

माझ्या सात वर्षांच्या संसदीय कार्यकालात मी आजपर्यंत कोणत्याही पुरुषाने अशा प्रकारचे वक्तव्य करताना ऐकलेले नाही, असे महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. हा विषय महिलांचा नसून लोकसभेसह राज्यसभेतही अनेक पुरुषांनी आपल्या सामाजिक, राजकीय कार्यकालात महिलांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे. हा केवळ महिलांचाच नाही, तर पुरुषांचा देखील अपमान आहे, अशा शब्दांत इराणी यांनी निषेध नोंदवला आहे.

अशा प्रकारचे वर्तन लाजिरवाणे असल्याचे कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही म्हटले आहे. रमा या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीत होत्या. त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे होते. आझम यांनी एक तर मागी मागावी किंवा मग त्यांना निलंबित करण्यात यावी, अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे.

भाजपसह टीएमसी, डीएमके आणि इतर अनेक पक्षांच्या खासदारांनी आझम खान यांचा निषेध केला. जो महिलांचा सन्मान करण्याचे जाणत नाही, त्याला देशाची संस्कृती काय आहे हेच माहीत नाही, हे सिद्ध होते, असे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.