नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
पाटण : पाटण तालुक्यातील हेळवाकमध्ये चारच दिवसांपूर्वी कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्याने घरात घुसल्याची घटना ताजी आहे. अशातच पुन्हा रविवारी मध्यरात्री बिबट्याने पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात दर्शन दिल्याने पाटण शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाटणनजीक बाळासाहेब देसाई कॉलेजच्या पाठीमागील बाजूस २९ सप्टेंबर रोजी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते. तर चार दिवसांपूर्वीच कोयनानगरजवळील हेळवाकमध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या थेट घरात घुसला होता. या घटना ताज्या असतानाच रविवारी मध्यरात्री पाटण ग्रामीण रुग्णालय परिसरात झालेली बिबट्याची एंट्री नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहे.मानवी वस्तीत बिबट्याने आपला मुक्काम वाढवला असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत असून वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पाटण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा बिबट्याच्या वावराचे प्रमुख कारण मानले जात आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नगरपंचायतीचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोणतीही उपाययोजना नगरपंचायतीकडून करण्यात येत नाही. याचा सर्वाधिक तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीच्या कचरा डेपो परिसरात बिबट्याने अनेक भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. तसेच पाटण येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पाळीव कुत्र्यावरील हल्ला हा बिबट्याच्या वावराचे कारण मानले जात आहे. त्यामुळे सध्या पाटण परिसरात बिबट्याने मोर्चा वळवला असून भटकी कुत्री त्याचे लक्ष्य ठरत आहेत.
पाटण ग्रामीण रुग्णालय परिसरात वाहनचालकांच्या निदर्शनास आलेला बिबट्या भटक्या कुत्र्यांच्या शोधात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या परिसरात मानवी वस्ती आहे. रात्री-अपरात्री वाहन चालकांची या रस्त्यांवरून ये-जा असते. तर ग्रामीण रुग्णालय असल्याने रुग्णांना उपचार करण्यासाठीही ग्रामीण रुग्णालयांमध्ये नातेवाइक येत असतात. अशा परिस्थितीत बिबट्याने हल्ला केल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
लगतच्या चाफोली रोड परिसरात पहाटे 5 वाजल्यापासून मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. यामध्ये महिलांचीही संख्या मोठी असल्याने मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित बिबट्याचे वन विभागाने व्यवस्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाटण शहराच्या परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे ही घटना खरी आहे. रविवारी मध्यरात्री ग्रामीण रुग्णालय परिसरात बिबट्याचे काही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना दर्शन झाले. त्यानंतर वन विभागाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो परंतु बिबट्या निघून गेला होता सध्या वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. बिबट्याचे कायमस्वरूपी ठिकाण नसल्याने त्याचा शोध घेणे सध्या अवघड झाले आहे बिबट्या त्याच्या भक्ष्यासाठी येत आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
– एल. व्ही. पोतदार (वनक्षेत्रपाल पाटण).
पाटण शहरालगत बिबट्याचे दर्शन अनेक दिवसांपासून होत आहे आमच्या घराशेजारी शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने पाळीव कुत्र्याला ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याचे दर्शन होणे हे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. वन विभागाने तात्काळ याचे गांभीर्य ओळखून योग्य त्या उपाययोजना कराव्यात रात्रीची गस्त घालावी.
– मदन कदम (नागरिक).