पुणे (प्रभात वृत्तसेवा) – राज्यात गुरूवारी सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली असून, एका दिवसात 23 जण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक बाधित पुणे जिल्ह्यात आढलले असून, त्यातही सर्वात जास्त बाधित पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. यांचा समावेश करून राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 88 झाली आहे.
राज्यात ओमायक्रॉन बाधितांचा गुरूवारी उच्चांक झाला. आढळलेल्या 23 रुग्णांपैकी 22 रुग्ण “राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने तर 1 रुग्ण “राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळे’ने रिपोर्ट केला आहे.
पुणे जिल्ह्यात 13 बाधित आढळले असून, पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी तीन तर पिंपरी-चिंचवडमध्ये सात बाधितांची नोंद झाली. त्यानंतर मुंबईमध्ये पाच, उस्मानाबादेत दोन, ठाणे, नागपूर आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत प्रत्येकी एका बाधिताची नोंद झाली आहे.
या 23 बाधितांपैकी 16 बाधित आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत; तर सात बाधित त्यांचे निकटवर्तीय आहेत. यातील सहा जण मध्यपूर्व देशातून, चार युरोपातून, घाना आणि दक्षिण आफ्रिका येथून प्रत्येकी दोन, टांझानिया आणि सिंगापूर येथून प्रत्येकी एक आले आहेत.
यातील चार जण 18 वर्षांखालील बालके आहेत तर दोघे 60 वर्षे वयावरील आहेत.
यातील 17 जण लक्षणे विरहित असून, सहा जणांना सौम्य लक्षणे आहेत. यातील 18 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, एका रुग्णाचे लसीकरण झाले नाही आणि चार रुग्ण लसीकरणाला पात्र नाहीत.
एक नोव्हेंबर पासून आजपर्यंत 670 नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातील 124 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.