नवी दिल्ली – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत यांची नाराजी दूर करण्यासाठी कॉंग्रेसने तातडीने हालचाली सुरू केल्या. पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गुरूवारी रावत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले.
उत्तराखंडची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशात कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असणाऱ्या रावत यांनी बुधवारी राजकीय खळबळ उडवून दिली. एक ट्विट करून त्यांनी पक्ष संघटनेकडून किंवा नेतृत्वाकडून सहकार्य मिळण्याऐवजी पाठ फिरवली जात असल्याचे म्हटले. आता विश्रांती घेण्याची वेळ आली असल्याचे वाटते, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे कॉंग्रेसचा आणखी एक ज्येष्ठ नेता अस्वस्थ असल्याचे चित्र पुढे आले.
कॉंग्रेसच्या दृष्टीने रावत यांची भूमिका धक्कादायक ठरली. त्यापार्श्वभूमीवर, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी रावत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नाराजीची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी यापुढेही जोमाने सक्रिय राहण्याचे साकडे त्यांना घालण्यात आले. आता रावत यांची नाराजी खरोखरीच दूर झाली का ते आगामी काळात पुढे येईल.