लखनौ – उत्तर प्रदेशच्या चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती आतापर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडलेल्या नाही. आता निवडणूक जाहीर झाली असून 10 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यातच आता मायावती आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचं समोर आलं आहे.
केवळ मायावतीच निवडणूक लढविणार नाहीत, अस नसून त्यांचे सल्लागार सतीश मिश्र देखील निवडणूक लढविणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र तरी देखील मिश्र यांनी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष सरकार स्थापन करणार, असा दावा केला आहे.
दरम्यान समाजवादी पक्षाने 400 जिंकण्याच्या केलेल्या दाव्यावर मिश्र यांनी म्हटलं की, समाजवादी पक्षाकडे 400 जागांसाठी उमेदवारच नाहीत. तर मग 400 जागा ते कसे जिंकतील. एसपी किंवा भाजप सत्तेत येणार नाही. यावेळी बहुजन समाज पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मागील अनेक दिवसांपासून सतीश मिश्र एकट्याने झुंज देत बसपाचा प्रचार करत आहेत. अवधपासून ते पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी दौरे केले. उत्तर प्रदेशातील ब्राह्मन समुदायाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. मात्र अद्याप मायावती यांनी एकही सभा घेतली नाही. तसेच रोड शो देखील केला नाही.
बहुजन समाज पक्ष यावेळी एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.