लखनौ – उत्तर प्रदेशातील सगळ्यांत चर्चेत असलेली जागा म्हणजे वाराणसी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून पुन्हा निवडणूक लढणार आहेत. मायावती यांचा बहुजन समाज पक्ष येथून उमेदवार देणार का अशी चर्चा होत असतानाच त्याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
बहुजन समाज पक्षाने वाराणसीच्या जागेसाठी चार उमेदवारांची नावे मायावती यांच्याकडे पाठवली असल्याचे सांगण्यात आले. या चार जणांपैकी दोन जण पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तर एक मुस्लिम उमेदवार आहे.
वाराणसीत मोठ्या संख्येने दलित, ओबीसी आणि मुस्लिम मतदार आहेत.त्यामुळे बसपाच्या स्थानिक शाखेने येथील निवडणुकीसाठी स्थानिकांचीच नावे पक्षाकडे पाठवली आहेत. जरी चार नावे आली असली तरी पक्षाने स्पष्ट केले आहे की वाराणसीतून मुस्लिम उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
अन्य उमेदवारांमध्ये विशेषत: ब्राह्मण उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाउ शकतो. येत्या ५ एप्रिलपर्यंत कोणाला तिकीट देणार याची घोषणा केली जाऊ शकते.