इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन खोलीत झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धाचा झोपेतच मृत्यू झाला तर घरातील इतर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घडली आहे.
बी रामास्वामी असे मृत्यू झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचे नाव आहे. रामास्वामी यांच्या मुलगा प्रकाश रामास्वामी मागील एक वर्षापासून ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरत होता. 12.30 च्या सुमारास प्रकाशने स्कूटरमधून बॅटरी काढली आणि चार्जिंगसाठी ठेवली. वडील रामास्वामी, आई कमलम्मा आणि मुलगा कल्याण बॅटरी चार्जिंग लावलेल्या खोलीत झोपले होते. दरम्यान पहाटे चारच्या सुमारास या बॅटरीचा स्फोट झाला.यामध्ये वडील जखमी झाले. प्रकाश आणि त्यांची पत्नी कृष्णवेणी यांनाही किरकोळ दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान रामास्वामी यांची प्रकृती खालावली आणि हैदराबादला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली व स्कूटर बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चार्जिंग दरम्यान स्कूटरला आग लागली आणि नंतर अचानक स्फोट झाला. यामध्ये घरात झोपलेल्या 80 वर्षीय रामास्वामी यांचा मृत्यू झाला तर अन्य् चार सदस्य जखमी झाले. जखमींना रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.