बारामती तालुका आणखी सात दिवस “लॉक’

होम डिलिव्हरीसाठी परवानगी : प्रशासनाचा निर्णय

बारामती/ जळोची -बारामती शहर व तालुक्‍यातील लॉकडाऊन संपणार की वाढणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले असतानाच आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, यावेळी होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी बारामती शहर आणि तालुक्‍यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. बारामती शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी सात दिवस लॉकडाऊन हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अत्यावश्‍यक सेवेसाठी होम डिलिव्हरीसाठी अनुमती देण्यात आली आहे.

सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. आणखी सात दिवस हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी पदाधिकारी व व्यावसायिक, उद्योजकांच्या चर्चेनंतर लॉकडाऊन पुन्हा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्यावश्‍यक सेवा मात्र घरपोच देण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये किराणा व भाजीपाला साहित्याचा समावेश आहे. दूध वितरण सकाळी सात ते नऊदरम्यान होणार आहे. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा मागील लॉकडाऊन प्रमाणेच बंद राहतील.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.