पुणे – व्हिडिओ कॉलद्वारे फसवणुकीचा भामट्यांचा “फंडा’

अनेकांना केले ब्लॅकमेल : आतापर्यंत 100 वर पीडित पुरुषांची पोलिसांत धाव

पुणे  – सुरुवातीला तरुणींचे आकर्षक फोटो आणि नाव वापरून सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करायची. त्यानंतर पुरुषांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून नग्न व्हिडिओ चॅटचे रेकॉर्डिंग करत ब्लॅकमेल करणाऱ्या राजस्थानमधील दोघा भामट्यांना राजस्थान पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या 5 महिन्यांत या भामट्यांनी पुण्यातील तब्बल 100 पेक्षा जास्त जणांना जाळ्यात ओढल्याचे सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. हे सर्व पीडित पुरुष 25 ते 55 वर्षे वयोगटातील आहेत.

राजस्थानमधील भामटे मुलगी असल्याचे भासवत पुरुषांशी सुरुवातील मेसेजद्वारे संवाद साधत. त्यानंतर पीडितांचा विश्‍वास संपादन करून फोन नंबर मिळवत. “साऊंड मॉड्युलेटिंग सॉफ्टवेअर’चा वापरून करून भामटे पुरुषांना कॉल करत. ज्यामुळे भामट्यांचा आवाज महिलांसारखा येत होता. हे सॉफ्टवेअर वापरून त्यांनी पीडितांशी गप्पा मारल्या. नंतर व्हिडिओ कॉल करून महिलांचे अश्‍लिल जुने व्हिडिओ प्ले करत.

यामध्ये संबंधित पुरुषांनाही नग्न होण्याची विनंती केली जात असे. त्याला पीडितही प्रतिसाद देत होते. त्यानंतर सॉफ्टवेअरचा वापर करून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात होता. त्यानंतर हे रेकॉर्ड सोशल मीडियावर अपलोड करण्याची आणि ते मित्रांना टॅग करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात येत होती. धमकीला घाबरून काही पीडितांनी ऑनलाइनद्वारे पैसे पाठवले. परंतु, बऱ्याच प्रकरणांमध्ये या भामट्यांची मागणी वाढत गेल्याने पीडितांनी पुणे पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रॅंचकडे तक्रार दिली.

 

उपकरणांचा आयपी ऍड्रेस, बॅंक खात्याचा तपशिलावरून शोध
पुण्यातील तब्बल शंभरावर तक्रारींनंतर पोलीस उपायुक्‍त (सायबर) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथक या प्रकरणांचा तपास करत आहे. तपासादरम्यान भामट्यांनी वापरलेल्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा आय.पी. (इंटरनेट प्रोटोकॉल) ऍड्रेस तसेच बॅंक खात्याचा तपशील पोलिसांनी शोधला असता, तो राजस्थान येथील निघाला. त्यानंतर पुणे पोलीस राजस्थान पोलिसांच्या संपर्कात होते. राजस्थान पोलिसांनी अशाच गुन्ह्यांत दोघांना अटक केली होती. त्यानुसार, पुणे पोलिसांनी राजस्थानात भेट दिली.

त्यावेळी गुन्ह्याची उकल झाली. दोघा भामट्यांनी आतापर्यंत प्रत्येक व्यक्‍तीकडून 3000 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्‍कम उकळली आहे. सध्या दोघेही भामटे राजस्थान येथील खोह जि. भरतपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे सायबर पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.