पुणे – दुपारी बाराच्या आतच घरात!

लॉकडाऊन नियमांची कठोर अंमलबजावणी

पुणे –  शहरातील करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असला, तरी रुग्णसंख्येतील वाढ अजूनही हजाराच्या घरात आहे. त्यामुळे प्रशासनाने पुण्यातील लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दुपारी 12 वाजेनंतर फिरणाऱ्यांची चौकशी आणि दोषी आढळल्यास दंड ठोठावला जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

शहरात करोना संसर्ग फोफावल्याने कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, सकाळी अकरा वाजेपर्यंत किराणा व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना मुभा दिली आहे. याचाच गैरफायदा उठवत अनेकजण विनाकारण फिरत आहेत. सकाळी भाजी खरेदीसाठी तर मोठ्या प्रमाणात चौका-चौकांत गर्दी असते. तीच अवस्था किराणा दुकानांपुढे आहे. यामुळे निर्बंध असले, तरी नागरिक नियम पाळत नसल्यामुळे करोना कसा आटोक्‍यात येणार? असा प्रश्‍न पडला आहे.

सुरुवातीला पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने कठोर भूमिका घेतली नव्हती. मात्र, आत उच्च न्यायालयानेही पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवर भाष्य केल्यामुळे पोलिसांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्‍यकता असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

 

दरम्यान, मंगळवारी ठिकठिकाणी नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली होती. दुपारनंतर प्रत्येक वाहन चालकाची तपासणी सुरू होती. नागरिक काही ना काही कारण सांगत ते अत्यावश्‍यक असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना प्रत्येकाची समजूत घालण्यास व दंड आकारण्यास मोठा वेळ जात होता. अनेक वाहनचालक आक्रमक पवित्रा घेत असल्याने त्यांना कायदा दाखवण्याची वेळही काही ठिकाणी आली.

 

शहरात आता दुपारी 12 वाजेनंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
– अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्‍त, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.