डोर्लेवाडी -बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सुपुत्र आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) जवान अशोक इंगवले (वय 32) हे पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना त्यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सध्या पंजाब राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जवान इंगवले यांची नेमणूक केली होती. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असताना ते चक्कर येऊन पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
ते आठ वर्षांपासून सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत काश्मीर, पंजाब, दिल्ली, रांची याठिकाणी देशसेवा बजावली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त गावात धडकताच संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
बुधवार (दि.16) जवान अशोक इंगवले यांचे पार्थिव त्यांच्या गावी सोनगाव येथे आणण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, चार वर्षांचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
सामाजिक कार्यात सक्रिय
जवान अशोक इंगवले हे राष्ट्रीय कराटे चॅम्पियन होते. तसेच ते माळकरी देखील होते. व्यसनमुक्ती प्रचारासाठी त्यांनी अनेक युवकांना प्रेरित करण्याचे काम केले होते. गावी सुट्टीवर आल्यानंतर ते सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावांवर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.