बारामती – शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री होत असताना केलेल्या कारवाईत विविध कंपनीच्या गुटख्यासह साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गणेश दत्तात्रय मदने (वय २५, रा.मळद, ता. बारामती) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गुणवडी रोड सार्थक कलेक्शन शेजारी श्री दत्त ऑटोलाइन्स या दुकानासमोर गुटखा तंबाखू ने भरलेली क्वालिस गाडी उभी आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. गणेश दत्तात्रय मदने (वय २५. रा.मळद ता. बारामती) हा त्या ठिकाणी विविध कंपनीचा गुटका विक्रीसाठी घेऊन आलेला होता. दोन पंचांसमक्ष त्याच्यावर छापा मारून त्या ठिकाणी त्याची क्वालिस गाडी क्र MH10AS1999 व (विमल, गोवा, सौदागर V 1) गुटख्याची बोरी मिळून आल्या. त्याच्या ताब्यातून गाडी मधून 3 लाख 19 हजार रुपयांचा निव्वळ गुटखा, 5 लाख रुपये किंमतीची क्वालिस गाडी. दहा हजार रुपयांचा मोबाईल व 26 हजार रुपये गुटका विक्रीतून आलेले पैसे असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, कल्याण खांडेकर, अभिजीत कांबळे, दशरथ इंगवले व उपविभागीय कार्यालयाकडील कर्मचारी दराडे साळवे भोई यांनी केली.