बारामती, (प्रतिनिधी)- दि बारामती सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य व नावाजलेली नागरी सहकारी बँक असून बँकेचा एकूण व्यवसाय ३५०० कोटींवर गेलेला आहे. बँकेच्या दि. ३१ मार्च २०२३ अखेरच्या आर्थिक प्रगतीनुसार रिझर्व बँकेने सभासदांना त्यांच्या भागावर शेकडा ५ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यास परवानगी दिली आहे.
बँकेने राबविलेल्या विशेष वसुली अभियानामुळे बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम झालेली असून बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण शेकडा १३.५० टक्के इतके झालेले आहे. या गतआर्थिक वर्षाअखेर बँकेस रू. ५.२१ कोटी इतका निव्वळ नफा सर्व तरतुदी व आयकराची तरतूद करून झालेला आहे, अशी माहिती बॅंकेचे चेअरमन सचिन सातव यांनी दिली.
दि. 31 मार्च 2023 अखेर बँकेच्या ठेवी रू.२२२२.१० कोटी व कर्जवाटप रू. १४०६.३२ कोटी इतके झालेले असून बँकेची गुंतवणूक रू.८३५.१७ कोटी वर पोहोचलेली आहे.
बँकेचे प्रगतीत बँकेचे उपाध्यक्ष किशोर शंकर मेहता तसेच सर्व सहकारी संचालक अॅड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, देवेंद्र रामचंद्र शिर्के, उध्दव सोपानराव गावडे, विजयराव प्रभाकरराव गालिंदे, नामदेवराव निवृत्ती तुपे, मंदार श्रीकांत सिकची, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, जयंत विनायकराव किकले, रणजित वसंतराव धुमाळ, रोहित वसंतराव घनवट, नुपूर आदेशकुमार शहा (वडूजकर), डॉ. वंदना उमेश पोतेकर, कल्पना प्रदिप शिंदे व तज्ञ संचालक प्रितम सुर्यकांत पहाडे (सी.ए.) तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य शांताराम चिमाजी भालेराव, डॉ. श्री. अमोल चंद्रभान गोजे व अॅड. रमेश भगवानराव गानबोटे, मुख्यालयीन अधिकारी वर्ग, सर्व शाखाधिकारी, वसुली अधिकारी व बॅंकेचा सर्व सेवकवर्ग तसेच हितचिंतक यांनी घेतलेल्या परिश्रमाबदद्ल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले.
बँकेस मिळालेल्या यशाबद्दल सभासद व खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बँक आगामी काळातही विक्रमी नफा कमावून सभासदांना भागावर आणखी जादा लाभांश पुढील आर्थिक वर्षासाठी जाहीर करेल. बँकेच्या आजपर्यंच्या विकासामध्ये सभासदांचा बँकेवरील अढळ विश्वास, खातेदारांचे बँकेबरोबरचे अतूट नाते व ग्राहकांचा संतोष याचेच पाठबळ लाभलेले आहे.बँकेच्या वाटचालीत उपमुख्यमंत्री अजित पवार , बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच बँकेचा उत्तरोत्तर विकास होत आहे. -सचिन सातव, चेअरमन बारामती सहकारी बँक