वाघोली, (प्रतिनिधी)- शाळा प्रशासनाने परीक्षेच्या एक दिवस अगोदर फी वसुलीसाठी 10 वी चे हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघोलीतील पदाधिकार्यांकडून जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील प्रॉडीजी पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीप्रकरणी मनसैनिकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसैनिकांनी देखील स्कूलविरोधात गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
पालकांनी जुनी व इतर फी भरल्यानंतरच हॉल तिकीट दिले जाईल, अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतल्याने पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर मनसे पदाधिकार्यांनी विनंती करूनही हॉल तिकीट दिले नसल्याने मनसैनिकांनी स्कूल ऑफीसमध्ये तोडफोड केली होती. तोडफोडीनंतर लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत कर्मचारी युवराज कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनसेचे प्रकाश जमधडे, तुषार तांबे व अक्षय सूर्यवंशी व इतर यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी फी भरली नसल्याने परीक्षेच्या अगोदर पालकांना वेठीस धरून हॉल तिकीट देण्यास नकार देणार्या जेएसपीएम प्रॉडीजी पब्लिक स्कूलच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रकाश जमधडे यांनी लेखी अर्ज करून लोणीकंद पोलिसांकडे केली आहे.