बारामती (प्रतिनिधी) : शहरातील जळोची येथील मातोश्री हॉटेलमधील आचाऱ्याचा त्याच हॉटेलमधील दुसऱ्या कामगाराने किरकोळ कामाच्या कारणावरून खून केल्याची घटना आज दुपारी घडली. ज्याचा खून झाला आहे तो नाशिकचा तडीफार गुंड असल्याची माहिती समोर येत असून खुनी पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एक तासाच्या आत बारामती तालुका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री हॉटेलमधील आचारी म्हणून काम करीत असलेला गणेश प्रभाकर चव्हाण (रा.मालेगाव जि. नाशिक ) याचा खून झाला आहे. दुसरा कामगार आरोपी विकास दीपक सिंग (वय- 23 मूळ रा. चंदिगड पंजाब सध्या रा. अमराई बारामती जिल्हा पुणे ) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी दीपक सिंग याने किरकोळ कामाच्या कारणावरून गणेश याचा चेहऱ्यावर तसेच पोटात चाकूने वार करून मातोश्री हॉटेल च्या आवारात खून केला. खून केल्यानंतर आरोपी पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला शहरातील माळावरील देवी येथे बेड्या ठोकल्या.
“यापुढे आपल्या हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलेले सर्व कामगार यांची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे द्यावी. तसेच स्वतःकडे त्यांची एक फाईल बनवून ठेवावी . तसेच सर्व कामगारांचे व्हेरिफिकेशन करून ते गुन्हेगार नाहीत याची खात्री करूनच त्यांना कामावर ठेवावे. असे न केल्यास भा.द.वि कलम 188 प्रमाणे हॉटेल धारक यांच्यावरती कायदेशीर गुन्हे नोंद केले जातील याची दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी हॉटेल मालकांना केले आहे.”
अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक रंजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, नाईट राउंड चे पोलीस अधिकारी लेंडवे व पोलीस नाईक अमोल नरूटे, सहाय्यक फौजदार भागवत आदींनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.