पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार असून, उमेदवारही निश्चित आहे. त्यामुळे महादेव जानकर महायुतीत आले, तरी ते बारामतीमधून निवडणूक लढवतील, ही विरोधकांनी पसरविलेली अफवा आहे. त्यामुळे बारामतीचा उमेदवार ठरला असून, तो बदलणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची समजूत काढली, तसेच सुनेत्रा पवार याच बारामतीच्या उमेदवार असतील यावरही अजित पवार यांनी अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा मतदारसंघांसंदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असल्याचे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाची बैठक असली, तरी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवरच सर्वाधिक चर्चा झाली. त्यात महादेव जानकर यांच्या नावाची बारामतीसाठी असलेली चर्चा, विजय शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढण्याचा जाहीर केलेला निर्णय, हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत चर्चा झाली.
त्यात शिवतारेंचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तर महादेव जानकरांबाबत विरोधक अफवा पसरवत असून, त्याकडे लक्ष न देता प्रचारात लक्ष घालण्याच्या सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. याशिवाय खोटा प्रचार रोखण्यासाठी लक्ष द्या, अशा सूचनाही या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर बारामतीची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्यावर पदधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले.
प्रचाराची धुरा आमदारांवर
महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद २८ रोजी असून, त्यानंतर आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर होतील. त्यामुळे तोपर्यंत प्रत्येक टप्पानिहाय पक्षाच्या आमदारांनी प्रचारात सहभागी व्हावे, यासाठी आमदारांकडे लोकसभेची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्यासमवेत पाच ते सहा जणांची टीम असणार आहे. ही टीम सर्व प्रचाराची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक मतदारसंघनिहाय महायुतीचे उमेदवार असलेल्या ठिकाणी समन्वयक नेमले असून, त्यांच्यासोबत काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.