पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवयवदानासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांत अद्यापही बरेच समज, गैरसमज आहेत. अवयव प्रत्यारोपण करताना येणाऱ्या अडचणींची त्यांना कल्पना असावी; याशिवाय त्यासाठीच्या सरकारी योजना, मोठ्या औद्योगिक कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत होणारी मदत याबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेला बेबसी हा लघुपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
राहुल पणशीकर यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट फिल्म अर्काइव्हमध्ये दाखविण्यात आला. राहुलस् ग्राफिक्स या संस्थेतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर,
कोटबागी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. महेश कोटबागी, गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, अवयवदानासंदर्भात गेली अनेक वर्षे सोलापूर शहरात जनजागृती करणारे डॉ. हरीश रायचूर, डॉ. स्नेहा घारमळकर, लघुपटातील सर्व कलाकार या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी या लघुपटात भूमिका साकारली आहे.
राहुल पणशीकर यांनी याआधी प्रदर्शित केलेल्या राख आणि दुविधा या लघुपटांचा पुढचा भाग म्हणजे बेबसी हा लघुपट आहे. आपला मुलगा गेल्यानंतर सर्वसामान्य गरिबांना या दु:खातून जावे लागू नये आणि वेळेत मदतीचे पर्याय उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अवयवदान प्रत्यारोपण व डायलिसिससाठी सरकारी योजनांचा पाठपुरावा, यासाठी मोठ्या औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत मदत मिळण्यासाठी त्याचा सीएसआरमध्ये समावेश करून घेणे, यासाठी तात्यासाहेब प्रयत्न करतात आणि या प्रयत्नांना यश मिळते, हे या लघुपटाद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
अवयवप्रत्यारोपण आणि यादरम्यान रुग्णांना लागणारे डायलिसिस यासाठी लाखो रुपये खर्च होत असताना सरकारी आणि सीएसआरअंतर्गत मिळणारी मदत याबद्दल जागृती महत्त्वाची असल्याचे किर्लोस्कर यांनी नमूद केले.
हा लघुपट अवयव प्रत्यारोपणाची मदत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे काम करेल, असा विश्वास यावेळी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. १९९४ सालापासून कायदा आल्यानंतर अवयवदान जागृतीला गती मिळाली, असे सांगत माणूसपणाची संवेदना आणि माणुसकीचा शोध या लघुपटातून दाखविला असल्याचे मोहिते म्हणाले. पणशीकर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.
अधिकृत रुग्णालयांकडूनच मदत घ्या
अवयव प्रत्यारोपण करताना अधिकृत रुग्णालये, सामाजिक संस्था, सरकारी संस्था यांकडूनच मदत घ्यावी, असे आवाहन या लघुपटात करण्यात आले असून, अवैधपणे होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाच्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी जागृतीदेखील करण्यात आली आहे, असे दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी या वेळी सांगितले.
मोफत डायलिसिस सेंटर सुरू करा
अवयव प्रत्यारोपण होईपर्यंत रुग्ण मृत्यूच्या छायेत असतोच. त्यासाठी येत असलेल्या खर्चाने ती छाया आणखी दाट होते म्हणून समाजाने एकत्रित येत जास्तीत जास्त मोफत डायलिसिस सेंटर सुरू करावीत, असे आवाहन डॉ. महेश कोटबागी यांनी केले