मुंबई – गुडीपाडवा मेळाव्यावर राजकीय धुरळा उडवून देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात उत्तर सभा घेणार आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधीच हिंदी शेर असलेलं एक पोस्टर चर्चेत आलं आहे.
विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी राज ठाकरेंच्या सभेपूर्वी एक बॅनर लावलं आहे. या बॅनरवर हिंदीतून शेर लिहिण्यात आला आहे. वास्तविक पाहता, राज ठाकरे हे मराठीचाच आग्रह धरतात. एवढचं काय तर मनसेच्या आमदारांनी हिंदीतून शपथ घेणाऱ्या समाजवादी पक्षांचे आमदार अबू आझमी यांना सभागृहात मारहाण केली होती.
दरम्यान मनसेच्या बॅनरवरील हिंदी चर्चेचा विषय ठरली आहे. या संदर्भात महेश कदम म्हणाले की, “राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. ‘मुंबई मे बैठा है हिंदुओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा!’ ही वाक्यरचना राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला साजेशी आहे. हा शेर मराठीत करण्याचा प्रयत्न केला. पण शब्दरचना नीट होत नव्हती. त्यामुळे हिंदीमध्ये लिहिलं.
मनसे मराठी भाषेचा मुद्दा कधीच सोडणार नाही. पण देशपातळीवर राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं नेतृत्व करावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे हिंदीत बॅनर लावले म्हणून मराठीचा मुद्दा सोडला असं नाही, असंही कदम यांनी नमूद केलं.