मुंबई – भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, त्यामुळे सदावर्ते यांनी जमा केलेल्या पैशामध्ये या दोघांचा वाटा आहे का? याचा तपास संबंधित यंत्रणेने करायला हवा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केलं आहे.
ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा जवळपास पाच महिने आझाद मैदानावर सुरु होता. या संपाला जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा घोषणा तिथे करण्यात आल्या होत्या. गोरगरीब, कष्टकरी कामगारांकडून पैसे घेतले नाहीत असे सांगणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांकडून आधी प्रति व्यक्ती 530 रूपये आणि त्यानंतर 300 रूपये जमा केले, असे सोमवारी आम्हाला न्यायालयामार्फत समजले.
जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असतील तर या पैशांचा आकडा फार मोठा होतो. रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कमटॅक्सच्यादृष्टीने गुन्हा आहे. समजा सदर पैसै हे कायदेशीर फी म्हणून घेतले गेले असतील तर त्या रकमेवर कर लागला पाहिजे. महामंडळाचे विलिनीकरण व्हावे याला कोर्टाने मान्यता दिली नाही. त्यामुळे पाच महिने कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले, असे तपासे म्हणाले.
त्यानंतर सिल्व्हर ओकवर केल्या गेलेल्या भ्याड आंदोलनातील आंदोलकांना एका चुकीच्या दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. भारतीय जनता पक्षामार्फत त्याला खुलं समर्थन देण्यात आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचाही त्या जमा केलेल्या रकमेमध्ये वाटा आहे का? याचा तपास संबंधित यंत्रणेने करायला हवा, असे महेश तपासे म्हणाले.